कणकवली : फोंडाघाट बाजारपेठ परिसरातून सविता आश्रमात दाखल करण्यात आलेले, मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले ६५ वर्षीय सुरज लक्ष्मण वाजे यांचे जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे उपचारादरम्यान निधन झाले. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फोंडाघाट बाजारपेठ परिसरात सुरज वाजे हे विमनस्क अवस्थेत फिरत असल्याची माहिती सविता आश्रमाला मिळाली होती. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना आश्रमात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले नाव सुरज लक्ष्मण वाजे असून आपण रत्नागिरी येथे राहत असल्याचे सांगितले होते. आवश्यक नोंद करून त्यांना सविता आश्रमात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सविता आश्रमाचे देवू रामचंद्र सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सुरज लक्ष्मण वाजे यांच्याबाबत अधिक माहिती अथवा त्यांच्या नातेवाईकांची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.