ग्रामीण विकासाला नवी झळाळी
महायुती सरकारचा निर्णायक उपक्रम
सिंधुदुर्ग : राज्यातील महायुती सरकारने ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील ७५ गावांची निवड करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तब्बल २१ गावे प्रायोगिकरित्या निवडली गेली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून या गावांना प्रकल्पात प्राधान्य मिळाले आहे.
तंत्रज्ञानाधारित ग्रामीण परिवर्तन
ग्रामीण भागाचे रूपांतर स्वयंपूर्ण, तंत्रज्ञान-सक्षम आणि सक्षम समुदायांमध्ये करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत खालील महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने डिजिटल संपर्क, ई-शासन सेवा, स्मार्ट शिक्षण, ग्रामीण आरोग्यसेवा, आधुनिक शेती व कृषि सेन्सर्स, स्वच्छता उपक्रम, नवीकरणीय ऊर्जा, स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय हॉटस्पॉट, आपत्ती व्यवस्थापन अशा सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत.
वैभववाडी तालुक्याची राज्यस्तरीय निवड
यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील सातनवरी येथे प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात दहा गावे निवडण्याची योजना जाहीर झाली. त्याआधारे पहिल्या टप्प्यात निवडलेली गावे पुढीलप्रमाणे
नागपूर १०, अमरावती २३, हिंगोली ११, पुणे १० आणि सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावे.
प्रकल्पात समाविष्ट झालेली २१ गावे
निम, तिरवडे-तर्फ खारेपाटण, हेत, उपळे, नेर्ले, एडगांव, अरूळे, सहुरे-शिराळे, कुर्ली, लोरे नं. २, आचिर्णे, खांबाळे, कुसूर, उबंर्डे, सोनाळी, कुंभवडे, आखवणे-भोम, मांगवली, भूईबावडा, ऐनारी आणि मौदे ही गावे स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्पात समाविष्ट झाली आहेत.
प्रकल्पासाठी दोन पातळ्यांवर समित्या गठीत
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तर समिती!
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली असून, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी, कृषी व पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महावितरण, बीएसएनएल, वन विभाग, शिक्षण विभागाचे अधिकारी सदस्य म्हणून असतील.
ग्रामस्तर समिती
ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. यात ग्राम पंचायत अधिकारी (सदस्य सचिव), महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक यांचा समावेश असेल.
आधुनिक सेवा गावागावात
प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय हॉटस्पॉट्स, डिजिटल शिक्षण, उपकेंद्र पातळीवरील आरोग्यसेवा, ई-गव्हर्नन्स, महिलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, स्मार्ट कृषि सेन्सर्स अशा सेवा उपलब्ध होणार आहेत.
बीएसएनएलकडून ‘भारत नेट’ फेज-१ अंतर्गत केलेल्या इंटरनेट जोडणीचा योग्य तांत्रिक वापर केला जाईल. तर महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ भारतनेट फेज-२ नेटवर्कसाठी सहकार्य करणार आहे.
तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात विकासाचा नवा अध्याय
या प्रकल्पामुळे वैभववाडी तालुक्यातील निवडलेल्या गावांना स्मार्ट सुविधा, शाश्वत विकासाची दिशा आणि नव्या संधींची झळाळी मिळणार आहे. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.