संविधानाची ताकद कृतीतून सिद्ध करू – नाम. नितेश राणेंचे प्रतिपादन
कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपापल्या पद्धतीने संविधानाची ताकद घट्ट करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही कृतीतून काम करण्याचे प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथे संविधान दिनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी उपस्थितांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा… विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, निसार शेख, अजित तांबे, गौतम खुडकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, सिद्धार्थ जाधव, अशोक कांबळे, तरंदळे सरपंच सुशील कदम आदी उपस्थित होते.
पुढे नाम. नितेश राणे म्हणाले, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. वर्षानुवर्षे गावांतील वाडी वस्त्यांना जातीवाचक नाव दिली गेली. ती नाव बदलणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्यामुळे आपल्या संविधानाची ताकद आपण प्रत्येकजण दररोज आजमावतो व अनुभव घेतो. त्यामुळे आपण जेव्हा आजूबाजूच्या राज्यांकडे पाहतो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद खऱ्या अर्थाने दिसते. त्यामुळे आजच्या दिवसच महत्व निश्चितपणे फार मोठं आहे.