स्वार्थासाठी विरोधकांकडून शहर विकास आघाडी – समीर नलावडे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहर हे गेली काही वर्षे आम्ही सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कणकवली शहर वाढती लोकसंख्या विचारात घेवून रिंग रोडचा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. शहरातील रस्ते, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, गणपती साना येथील बहुप्रतिक्षित रखडलेला कणकवली जाणवली जोडणारा पुल, गणपती साना येथील कृत्रिम धबधबा यासारखी महत्वाची विकासकामे गेल्या 5 वर्षात मार्गी लावली. त्यामुळे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी या शहरात आणला. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असल्याने भविष्यात एक आदर्श शहर बनविण्याची आमची बांधिलकी असेल. विरोधकांकडून स्वार्थासाठी शहर विकास आघाडीचा प्रयोग असल्याचा आरोप भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी केला.
पुढील 5 वर्षांत शहरांचा चेहरा मोहरा बदलणार –
कणकवली शहर हे जिल्ह्यातील विकासात्मक नावजलेले शहर आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षात अद्यावत स्विमिंग पुल बांधण्यात येईल. त्यामध्ये राज्यस्तरीय जलतरंग स्पर्धा घेता येतील. शहरवासियांना या स्विमिंग पुलचा लाभघेता येईल. स्पोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात अंडरआम क्रिकेट साठी इंटरनॅशन क्रिकेट मैदान बनवण्यात येईल. शहरातील प्रत्येक वाडीतील होणा-या क्रिकेट स्पर्धा या त्या मैदानावर होतील. त्या जोडूनच शुटींग स्पर्धेसाठी देखील मैदान असेल. राज्यस्तरीय व विविध स्तरातील खेळणा-या खेळाडूंसाठी कॅरम स्पर्धेसाठी व्यासपीठ तयार केले जाणार आहे. याचबरोबर अत्याधुनिक सुविधांसह नव कणकवलीच स्वरुप विकासात्मक पध्दतीने निर्माण करणार असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.
आरक्षणे विकास करण्यावर देणार भर –
कुठल्याही शहरात काम करणा-या नेतृत्वाकडे 18 नागरिक सुविधा निर्माण करण्याचे ध्येय आवश्यक असते. रस्ते , पाणी, वीज या प्रमुख गरजांबरोबरच शहरवासियांना विविध सुविधा देण्यासाठी केंद्र आणि राज्यामध्ये असलेला भाजपाच्या सत्तेचा उपयोग होणार आहे. कणकवली शहरात विविध ठिकाणी असलेली आरक्षण विकसित करण्यासाठी एक रोड मॅप तयार केला जाईल. भाजी मार्केट समोरील पार्किंगचे आरक्षण एका खाजगी विकासामार्फत विकसित करुन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. कणकवली मुख्य चौकात असलेले भाजी मार्केट विकसित केले जाणार आहे. संबंधित मार्केट मधील गाळेधारकांना त्यामध्ये पुर्नर्वसन केले जाईल. त्याचबरोबर विविध आरक्षण नागरी सुविधांसाठी टाकलेले आहेत. ती आरक्षणे विकसित करण्यावर आमचा भर असणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात एका 35 गुंठ्याच्या आरक्षणामध्ये सुंदर असे नाट्यगृह उभारण्यात येईल. त्यासंदर्भात आवश्यकते प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत. पुढील वर्षभरात भव्यदिव्य नाट्यगृह नागरिकांना सेवेसाठी उपलब्ध असेल. रिंगरोड चा पुढील टप्पा हाती घेण्यात येईल, असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय राजवटीतही आम्ही सक्रीय –
कणकवली नगरपंचायत निवडणूक सुमारे 3 वर्षे लांबणीवर पडली होती. तरीदेखील कणकवलीतील जनतेच्या सुखः दुखाःत मी आणि माझे सहकारी नगरसेवक जात होतो. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते काम करत होते. मागील कोविड काळात अनेकांचे जीव वाचविण्यासाठी आम्ही उभारलेले कोविड सेंटर आजही जनतेच्या लक्षात राहिलेले आहे. त्यामुळे सत्ता असो वा नसो जनतेचे सेवक म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही काम करत राहिलो, त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मतदार बळी पडणार नसल्याचा विश्वास, समीर नलावडे यांनी व्यक्त केला.