कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना शहर विकास आघाडीला महत्त्वाचा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची भेट घेऊन अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
कणकवली नगरपंचायत निवडणूक स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर रंगणार असल्याची चर्चा असताना, संदेश पारकर यांनी जनतेच्या मागणीनुसार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत डॉ. मुणगेकर यांनी शहर विकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी संदेश पारकर, संदीप कदम यांसह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या पाठिंब्यामुळे आघाडीच्या प्रचाराला आणखी बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केली आहे.