सर्वच उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या छाननी प्रक्रियेत मोठा निर्णय देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाने दाखल केलेल्या तिन्ही हरकती फेटाळल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३, ५ आणि ६ मधील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र अंतिम सुनावणीत सर्वच उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आली.
यामुळे कणकवली शहर विकास आघाडीतील क्रांतिकारी विकास पक्षाचे सर्व उमेदवार वैध ठरले आहेत.
दरम्यान, शहर विकास आघाडीच्या पॅनलकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नामनिर्देशनावर हरकत घेतली होती. ती हरकत फेटाळण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपाचे संजय कामतेकर यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार उमेश वाळके यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. ती हरकतही छाननीवेळीच अमान्य ठरली.
या निर्णयामुळे क्रांतिकारी विकास पक्षाचे तसेच भाजपाचे सर्व उमेदवार छाननीत पात्र ठरले असून, कणकवलीतील निवडणूक सरशी आता अधिकच रंगतदार होणार आहे.