कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीला वेग येत असताना शहर विकास आघाडीने आज आपली ताकद अफाट उत्साहात दाखवली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आपल्या १७ नगरसेवक उमेदवारांसह तहसीलदार कार्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीदरम्यान “संदेश पारकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!”, “राजन तेली तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा गर्जना देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर दणाणून टाकले. मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आघाडीच्या ऐक्याचा भक्कम संदेश दिला.
विशेष म्हणजे, या शक्तीप्रदर्शनात सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींनीही सहभागी होत शहर विकास आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शहर विकास आघाडीच्या या दमदार शक्तीप्रदर्शनामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीची राजकीय तापमान आणखी वाढले असून आगामी दिवसांत संघर्ष अधिक चुरशीचा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.