कट्टा पोलीस स्टेशन येथे भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी
मालवण : कट्टा गुरामवाडी येथे रोहिणी रमेश गुराम यांची हत्या होऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांना अद्याप आरोपी सापडले नाहीत. तसेच कट्टा येथील सावरवाड व गुरामवाडी येथे काल बुधवारी चोरी झाली आहे. चोरीतील आरोपी देखील पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर कट्टा पोलीस स्टेशन येथे आज माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पोलीस उपअधीक्षक घनश्याम आढाव, मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. या दोन्ही घटनेतील आरोपी सापडले नसल्याने वैभव नाईक यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी त्यांनी पोलिसांकडे केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजने, कट्टा ग्रा. पं. सदस्य बाबू टेंबुलकर, शाखाप्रमुख रवी गुराम, शाखाप्रमुख बाबल गावडे, राजू गावडे, बाबू अंजनकर,श्री. गुराम आदी शिवसैनिक उपस्थित होते.