तर रुग्णालयाच्या १०२ रुग्णवाहिकेत डिझेल नाही ?
या सावळ्या गोंधळाने २५ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
वैभववाडी : रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने व वेळेत उपचार न झाल्याने उंबर्डे भुतेश्वरवाडी येथील २५ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने येथील ग्रामीण रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. सदर मुलीचा मृत्यू हा रुग्णवाहिका न मिळाल्याने व वेळेत उपचार न झाल्याने झाल्याचा आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हा आकस्मिक मृत्यू नसून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेला खून आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रमोद रावराणे यांनी केली. सुंदरा प्रकाश शिवगण वय २५ असे त्या मृत तरुणीचे नाव आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
मयत सुंदरा शिवगण हीला बुधवारी दुपारी उलट्याचा त्रास होऊ लागल्याने वडील प्रकाश शिवगण व आईने येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तिला येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी २.४५ वा. दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तिला सलाईन लावले. तिची प्रकृती चिंताजनक असताना दोन्ही डॉक्टर रुग्णालयातू बाहेर गेले. 108 ला कॉल केला परंतु दोन तास होऊन 108 उपलब्ध झाली नाही. 102 रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नसल्याचे येथील यंत्रणेने सांगितले. तिची तब्येत अधिक खालावल्याने नातेवाईकांनी तिला खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे हलविले. वैभववाडी पासून सहा किमी अंतरावर खांबाळे येथे वाटतच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालय दाखल झाले. प्रमोद रावराणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वेळेत उपचार न झाल्याने रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने या भगिनीचा मृत्यू झाला आहे. हा डॉक्टरांनी केलेला खून आहे असा आरोप प्रमोद रावराणे यांनी केला. संबंधित डॉक्टर हे ड्युटीवर असताना क्रिकेट खेळतातच कसे, ते बाजारात फिरतात कसे, असा त्यांनी सवाल केला.
यावेळी यावेळी उंबर्डे ग्रामस्थ किशोर दळवी, अतुल सरवटे, प्रकाश शिवगण, वासुदेव पावसकर, संतोष पांचाळ, अमित पांचाळ, पांडुरंग पांचाळ, सचिन सावंत, चंद्रकांत पांचाळ, गौरव पांचाळ, अक्षय पांचाळ आदी उपस्थित होते.