रुग्ण व नातेवाईकांत तीव्र नाराजी
पालकमंत्री ना. नितेश राणे ही समस्या लवकरच सोडवतील ; नागरिकांचा विश्वास
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे. उपचार आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालय असून, कणकवली तालुक्यासह आजूबाजूच्या गावांतील अनेक महिला तपासणीसाठी व प्रसूतीसाठी येथे येतात. मात्र स्त्रीरोग तज्ञ नसल्यामुळे त्यांना माघारी जावे लागते किंवा महागड्या खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागते. सध्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ नसल्यामुळे प्रसूती विभाग सामसूम असल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीमुळे गरोदर महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “सरकारी रुग्णालयातच मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य रुग्णांनी काय करावे?” असा संतप्त सवाल रुग्ण व नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी याबाबतची गांभीर्याने दखल घेऊन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.