मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा?
कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. छातीवर आणि हातांवर १७ पेक्षा जास्त वार झाल्याने हा खून अत्यंत निर्दयीपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दोडामार्ग तिलारी वसाहतीजवळील पुलाखाली रक्ताने माखलेली पण नंबर प्लेट नसलेली कार आढळली. तपासात ही कार मृत म्हणून प्रथमदर्शनी ओळख पटलेले श्रीनिवास रेड्डी (वय ५३) यांची असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
मात्र हा खून करण्यामागचा हेतू काय होता? कणकवली तालुक्यात खून झाल्यानंतर कार दोडामार्गपर्यंत कशी पोहोचली? आरोपींनी ती तिथे टाकून कुठे पलायन केले? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.
याबाबत अधिक चौकशी करताना नलवडे यांनी सांगितले की, “मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे एक पथक बेंगलोर च्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मृत श्रीनिवास रेड्डी हे डॉक्टर पेशातील असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिसांकडून या संदर्भात अधिकृत पुष्टी देण्यास गुप्तता पाळली जात आहे. घटनेचे गांभीर्य आणि मृतदेहावरील जखमा पाहता खुन्नसिने वार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला की वैयक्तिक कारणातून, याबाबतही पोलिसांना अद्याप ठोस धागा मिळालेला नाही.
मयताचे नातेवाईक कणकवलीत
शनिवारी दिवसभरात कणकवली पोलीस ठाण्यात मयत श्रीनिवास यांचे काही नातेवाईक दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांची कसून चौकशीही केली. मात्र त्याविषयी देखील अधिक माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
घटनेचे गुढ वाढतेय !
मयत श्रीनिवास पेशाने डॉक्टर होते. मग त्यांचा खून का केला गेला? खून दोडामार्ग येथे करून मृतदेह साळीस्ते येथे का टाकण्यात आला? खून करणारे बडे आसामी असल्याचे पोलिसी सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे बडे आसामी म्हणजे कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.