पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती
योजनेमध्ये जिल्ह्यातील ४३ हजार आंबा – काजू बागायतदारांचा सहभाग
सिंधुदुर्ग नगरी दिनांक १५ (जिमाका वृत्तसेवा) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री नितेश राणे भूषवणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे या कार्यक्रमासाठी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील ४३ हजार २१९ आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकूण १७,५७७ हेक्टर क्षेत्राचे विमा संरक्षण घेतले असून, त्यांना विमा नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत २०२४-२५ या अंबिया बहार हंगामासाठीचा संरक्षण कालावधी १५ मे २०२५ रोजी संपला असून, विमा नुकसान भरपाई अदा करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी अदा करण्यात येईल याबाबत भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई यांना निर्देशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.