ॲड. पार्सेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १६७ महसुली गावातील रुग्ण उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येतात. सुमारे ३० वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालय असताना चांगली सेवा मिळत होती, मात्र उपजिल्हा रुग्णालय झाल्यापासून ग्रामीण भागातून आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांची हेळसांड होत आहे. अनेक गंभीर रुग्णांना उपचारासाठी थेट गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (GMC) रेफर केले जाते, जिथे दुसऱ्या राज्यातील असल्याने त्यांना प्राधान्य मिळत नाही.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, रुग्णालयात अद्ययावत अति दक्षता विभाग असूनही फिजिशियन नसल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचे निदर्शनास आले आहे.रुग्णालयात रुग्णांचा ओघ पाहता किमान १५ पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असताना, सध्या फक्त पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. या पाच अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या १० पेक्षा जास्त विविध विषयातील कंत्राटी डॉक्टर आहेत, मात्र ते आपला व्यवसाय सांभाळून ठराविक वेळेतच सेवा देत असल्याने आणीबाणीच्या वेळी वेळेवर पोहोचू शकत नाहीत.

रुग्णालयासाठी अद्ययावत ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता असून त्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची गरज आहे. तसेच, ब्लड बँकेतही पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो, असे पार्सेकर यांनी म्हटले आहे.

ॲड. पार्सेकर यांनी मागणी केली आहे की, सचिवांनी तातडीने या उपजिल्हा रुग्णालयासाठी फिजिशियन उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या माहितीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात फक्त एकमेव फिजिशियन कार्यरत आहे.

सचिव विरेंद्रसिंहजी यांनी पूर्वी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे त्यांनी या विषयांत गांभीर्याने लक्ष घालून गरजू रुग्णांना दिलासा द्यावा, अशी कळकळीची विनंती सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड नंदन वेंगुर्लेकर, समिरा खलिल, रवी जाधव, रुपा मुद्राळे आदी उपस्थित होते.