६ ऑक्टोबर ला होणार सोडत जाहीर
सिंधुदुर्ग : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात जाहीर करण्यात येणार आहे. या सोडतीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, ही सोडत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग येणार
आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. विविध पक्षांतर्फे संभाव्य उमेदवारांची मोर्चेबांधणी आणि प्रचारयंत्रणा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सोडतीनंतर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.