मुंबई : सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी हालचाल घडवून आणणारा निर्णय घेत माजी आमदार राजन तेली अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर असताना मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
शिंदे यांनी यावेळी तेली यांचे औपचारिक स्वागत केले. अनेक दिवसांपासून ते शिंदे गटाशी संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधत त्यांनी शिवसेनेच्या गटात प्रवेश करून ठाकरे गटाला “जय महाराष्ट्र” केले.
राजन तेली हे सिंधुदुर्गातील अनुभवी आणि मोकळ्या स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे शिंदे गटासाठी मोठे बळ मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीमुळे सिंधुदुर्गातील राजकीय गणिते बदलणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षाच्या राजकीय ताकदीचे प्रदर्शन मानला जातो. त्यातच माजी आमदारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला आत्मविश्वास मिळणार असून, ठाकरे गटासाठी मात्र हा धक्का मानला जात आहे.