कणकवली : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी “एक दिवस – एक तास – एकत्र” या उपक्रमांतर्गत कणकवली शहरातील कनकनगर येथे स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनकनगर शिवशक्ती हॉल परिसर आणि अन्य परिसरातील भाग स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर रू. २०००/- दंड, तर माहिती देणा-यांना रू. ५००/- बक्षीस देण्यात येईल, असे सूचना फलकांवर लावण्यात आले.
स्वच्छता मोहिमेत नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, बचत गटातील महिला व कनकनगर नागरिकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला होता. मोहिमेत उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली.
यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सामुदायिक जबाबदारीबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.