कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : येथील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी त्यांना मोबाईल नंबर ९९३५१६९४७५ वरून ‘प्रिया देसाई’ नावाच्या महिलेचा व्हॉट्सॲप मेसेज आला. तिने स्वतःला आयआयएफएल कॅपिटल या कंपनीतील सहाय्यक असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये प्रिमियम स्टॉक खरेदीबाबत चौकशी करण्यास सांगितले. प्रिया देसाईने डॉक्टर यांना 1239 1v1 Premium VIP Service Group या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले आणि विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास सुचवले. सुरुवातीला नफा झाल्याने डॉक्टरचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर तिने IIHNWFL नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून ‘इन्स्टिट्युशनल स्टॉक’ मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. डॉक्टरनी फेडरल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यांतून मिळून ७,०३,००० रुपये विविध खात्यांवर ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्या ऍपमध्ये त्यांना १२,३१,७७६ रुपये नफा दाखवला गेला; मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती विथड्रॉ न होता प्रिया देसाईने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर संपर्क तोडला. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर डॉक्टरनी १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि १९ सप्टेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.