कणकवली : खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी – गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली.
मेलरॉय हे पणजी ते मुंबई प्रवास करत होते. बस कणकवलीनजीक आली असता मेलरॉय यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर ते बेशुद्धही पडले. बसचे पिकअप मॅन शाहरुख पटेल यांनी तत्काळ त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
मूळचे गोव्याचे असलेले डिसोझा हे मुंबईत वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच त्यांची बहीण रविवारी सकाळी कणकवली येथे पोहोचली. घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही आता सुरू आहे.