19.8 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हा अग्रेसर राहावा – जयप्रकाश परब यांचे आवाहन

कणकवली : तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यात यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केलं आहे की, या अभियानात शंभर टक्के सहभाग असावा. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात या अभियानाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनायक घेवडे, लघुपाटबंधारे विभागाचे श्री. भोसले, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, अधीक्षक मनिषा देसाई, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील श्री. हळदवणेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवणे, त्या अधिक सक्षम करणे आणि राज्यस्तरावर त्यांचे योगदान प्रभावी बनवणे असे आहे. परब यांनी स्पष्ट केले की, हे अभियान राबवणे अवघड नाही, मात्र त्यासाठी जबाबदारीने व मनापासून काम करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या स्तरावरून तालुका व जिल्हास्तरावर सहाय्यक अधिकारी नेमण्यात आले असून, आवश्यक ते मार्गदर्शन वेळोवेळी दिलं जाणार आहे.

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनीही या अभियानात तालुक्यातील सर्व ६४ ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे आणि अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा घडवणे, हे या अभियानामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

अभियानाची अंमलबजावणी १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेपासून सुरू होणार असून, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. शुभारंभाच्या दिवशी ग्रामसभेत मतदारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे. या अभियानाच्या अनुषंगाने तालुका स्तरावरून संपर्क अधिकारी आणि पर्यवेक्षकांची नेमणूकही पूर्ण झाली आहे.

या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य या चार स्तरांवर प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा आधार घेत, गावांचा सर्वांगीण विकास साधणे, पंचायतराज संस्थांना बळकट करणे आणि स्थानिक लोकसहभाग वाढवणे, ही या अभियानाची मूळ संकल्पना आहे.

अभियान राबवताना सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरितगाव निर्मिती, योजनांचे अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि श्रमदान हे घटक केंद्रस्थानी असणार आहेत. त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणीही याच कालावधीत प्रभावीपणे करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!