कणकवली : सिंधुदुर्ग–कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ–गगनबावडा घाटातील वाहतूक १३ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
करुळ घाटात ४ सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ‘यू’ आकाराच्या वळणावर मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दरडीला मोठे तडे गेल्यामुळे वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरू शकत असल्याने प्रशासनाने १२ सप्टेंबरपर्यंत घाटमार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने संपूर्ण घाटाची पाहणी करून पाच ते सहा धोकादायक ठिकाणे निश्चित केली. छत्रपती संभाजीनगर येथील एस.एस.पी.एल. कंपनीने गेल्या शनिवारपासून कुशल मनुष्यबळ वापरून दोरखंडाच्या साहाय्याने हे जोखमीचे काम हाती घेतले. गेल्या काही दिवसांतील पावसाने उघडीप दिल्यामुळे हे काम वेगाने पूर्ण झाले.
शुक्रवारी दरडी हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी करुळ घाटातील वाहतूक १३ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.