कणकवली : शहरातील प्रमुख उद्याने सध्या ओसाड अवस्थेत आहेत. तुटलेली खेळणी, वाढलेले रान आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे या ठिकाणांचा वापर लहान मुलांच्या खेळण्याऐवजी प्रेमी युगुलांकडून जास्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
कै. श्रीधरराव नाईक उद्यान हे यापूर्वी शहरातील मुलांसाठी आवडते ठिकाण होते. सुट्टीच्या दिवशी कुटुंबांसह नागरिक येथे मोठ्या संख्येने येत असत. सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र सध्या तुटलेली खेळणी, वाढलेली झाडी आणि इतर सोयी-सुविधांचा अभाव यामुळे चिमुकल्यांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
साईनगर आणि टेंबवाडी येथील उद्यानांचीही परिस्थिती जवळपास तशीच आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार खेळणी, बाके आणि प्रकाशव्यवस्था जीर्ण झाली आहे. स्वच्छता नसल्याने वातावरण अस्वच्छ बनले असून, रात्रीच्या वेळेस सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेने तत्काळ लक्ष देऊन सर्व उद्यानांमधील खेळणी, बाके, लाईट्स व परिसराची स्वच्छता यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेने योग्य तो निधी खर्च करून ही ठिकाणे पुन्हा मुलांच्या खेळण्यास व नागरिकांच्या फिरण्यासाठी उपयुक्त बनवावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..