देवगड : देवगड तालुक्यातील नाद येथे नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे. संशयित आरोपी प्रेम बहादूर बिष्ट (३८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. बेब्याचा सडा) आहे. त्याच्यावर देवगड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. नाद येथील बागायतदार यशवंत रमेश सावंत यांची ‘बेब्याचा सडा’ येथे कलम बाग आहे. या कलम बागेत संशयित प्रेम बिष्ट व त्याची पत्नी मजुरीचे काम करीत होते. बागेतील शेत घरात संशयित आपल्या पत्नी सोबत राहत होता. २६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास संशयित प्रेम बिष्ट याचा पत्नीशी वाद झाला. या वादात संशयित प्रेम बिष्ट याने लाकडी दांड्याने पत्नीला मारहाण करून तिचा खून केला. याबाबत माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. घटनेचा पंचनामा केला. घटनेचा अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.