कुडाळ – विज वाहिनीचा धक्का लागून झाराप-शिरोडकरवाडी येथील गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सात वाजता घडली. गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशीच ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळकर हे घराशेजारील बागेत देवासाठी फुले काढायला गेले होते. रात्री झालेल्या पावसामुळे विजेची तार तुटून पोफळीच्या झाडावर पडली होती. दुर्दैवाने, ही तुटलेली तार कुडाळकर यांच्या खांद्याला लागली आणि विजेचा जोरदार धक्का बसून ते जागीच कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि झारापचे बीट हवालदार अनिल पाटील अधिक तपास करत आहेत. तसेच वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद वनमोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुडाळकर यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.