ठाकरे सेनेची मागणी
“त्या”अधिकाऱ्याची बदली झाल्याशिवाय माघार नाही- अतुल बंगे
कुडाळ : तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २०२२ ते २०२५ या कालावधीत झालेल्या सर्व रस्ता कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता जयकुमार पिसाळ यांच्या कार्यकाळात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बंगे यांनी केला आहे. याबाबत बंगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिसाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून कुडाळमधील रस्त्यांची कामे होऊनही त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. कामांसाठी केवळ नावाला एजन्सी दाखवून विभागातीलच कर्मचारी आणि शाखा अभियंते यांच्यामार्फत ठेके घेतले जातात. या गैरव्यवहाराची तक्रार करूनही संबधित अधिका-यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, कुडाळ तालुक्यातून पिसाळ यांची बदली झाल्याशिवाय रस्त्यांमधील भ्रष्टाचार थांबणार नाही, असेही ते म्हणाले. या संदर्भात थेट सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्रालयातून कोणीतरी त्यांना पाठिंबा देत असल्याचा संशयही बंगे यांनी व्यक्त केला आहे.