तब्बल पाच कर्मचारी अनुपस्थित आढळले
चौकशी करून कर्मचाऱ्यांना निलंबित करणार, खेबुडकर यांची माहिती
बांदा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. या भेटीत सात पैकी तब्बल पाच कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने चौकशी करून या कर्मचाऱ्यांना निलंबित करणार असल्याची माहिती खेबुडकर यांनी दिली. यावेळी आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बांदा शहर व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी श्री खेबुडकर यांनी केली. गणेश चतुर्थी पूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेत. शहरात पाहणी केल्यानंतर त्यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांच्याकडून त्यांनी सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयात अस्वच्छता आढळल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी सात पैकी तब्बल पाच कर्मचारी त्यांना अनुपस्थित आढळल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी चौकशी करून सदर कर्मचाऱ्यांचे निलंबन करणार असल्याचे सांगितले.