24.2 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

प्रवासादरम्यान चहामधून गुंगी आणणारे औषध देऊन महिलेचे दागिने लांबविले

कणकवली : बस प्रवासादरम्यान चहामधून गुंगी आणणारे औषध देऊन बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मुळ ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर व सध्या रा. परटवणे, ता. जि. रत्नागिरी) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे, दिड तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व २८ हजार रुपये किंमतीची, पावणेचार ग्रॅमची सोन्याची अंगठी असा मिळून १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरला. १२ ऑगस्टला तळेरे बसस्थानक ते पाली या दरम्यान दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबात बीसाबी यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेची सुरुवात कणकवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

बीसाबी याच्या फिर्यादीनुसार, बीसाबी या पणजी येथून मुलीकडून रत्नागिरी येथे जायला निघाल्या होत्या. त्यासाठी त्या आधी पणजी -सावंतवाडी व नंतर सावंतवाडी कणकवली बसमध्ये चढल्या. पुढे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कणकवली बस स्थानक येथे त्या मालवण -रत्नागिरी बसमध्ये बसल्या. त्यावेळी बीसाबी यांच्याच सीटवर काळासावळा, उंच, अंगात जॅकेट असलेला इसम बसला होता. बस तळेरे बसस्थानक येथे थांबली तेव्हा त्या इसमाने बीसाबी यांना चहा पिण्यासाठी खाली उतरण्याचा आग्रह केला. बीसाबी यांनी नको म्हटल्यानंतर तो एसम एकटाच खाली उतरला. काही वेळाने त्याने खिडकीजवळ येऊन बीसाबी यांच्या हातात चहाचा कप दिला. अखेर बीसाबी यांनी तो चहा पिला.

दुपारी १.४५ वा. सुमारास बस पुढील प्रवासाला निघाली. त्याचवेळी बीसाबी यांना अस्वस्थ, झोप आल्यासारखे वाटू लागले. बीसाबी यांना पती आल्लाबक्ष फोन करत होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी त्याच, शेजारील इसमाकडे फोन दिला व बस कुठे पोहोचली, हे सांगायला सांगितले. पुढे त्याच धुंदीमध्ये बीसाबी पाली येथे उतरल्या व अन्य एका बसमध्ये चढल्या. पण, ही बस रत्नागिरीला जात नसल्याचे कंडक्टरने सांगितल्यानंतर त्या खाली उतरल्या. एवढ्या कालावधीत बीसाबी यांची तब्येत खूपच खराब झाली होती. काही लोकांनी त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
बीसाबी शुद्धीवर आल्या तेव्हा आपल्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. बीसाबी यांच्या पतीने बीसाबी आधी दाखल झाल्या होत्या, त्या पाली रुग्णालयात चौकशी केली. मात्र, बीसाबी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या गळ्यात मंगळसूत्र, हातात अंगठी नव्हती, असे पाली रुग्णालयातून सांगण्यात आले. अर्थातच सदरचे मंगळसूत्र व अंगठी आपल्या बाजूला असलेल्या त्या इसमाने लंपास केले, अशी बीसाबी यांची खात्री पटली. त्यानुसार त्यांनी लांजा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. मात्र, घटना कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!