औषधी वनस्पतींचे संगोपन केल्यास त्याचे फायदे : पत्रकार तुषार हजारे
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आले वृक्षारोपण
कणकवली : आजच्या काळात, पर्यावरणाचा ऱ्हास ही एक गंभीर समस्या बनली आहे. वाढत्या औद्योगिकी – करणामुळे आणि शहरीकरणामुळे नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास होत आहे. ज्यामुळे हवामान बदल आणि प्रदूषण यांसारख्या समस्या वाढू लागल्या आहेत. यावर मात करण्यासाठी, वृक्षारोपण करणे ही एक काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सुपारी, नारळ, चिकू, चाफा यासह अन्य औषधी वृक्ष लावण्यात आली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, डॉ. महादेव उबाळे, वैभव फाले, परशुराम आलव, श्री. देवलेकर, अशोक नारकर, विजय चौरे, डॉ. अंकित उपाध्याय, श्री. कुंभार, पत्रकार तुषार हजारे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.