22.2 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ना. राममोहन नायडू यांनी दिले आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांना विमानाने मुंबईतून जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने ही सेवा तात्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार नारायण राणे यांनी या सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत जिल्ह्यात मुंबई – सिंधुदुर्ग विमान सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी केली.
खा.नारायण राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान,मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही महत्त्वपूर्ण विमानसेवा तातडीने सुरू करण्याची भुमिका मांडली. कोकणातील जनतेला होणारा त्रास आणि गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन, ही सेवा लवकरात लवकर सुरू होणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी मंत्र्यांना पटवून दिले. खा.नारायण राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री राममोहन नायडू यांनी “ही सेवा तत्काळ पूर्ववत करू” असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
प्रवासाची सोय, आर्थिक गती आणि पर्यटन विकासाला चालना
या निर्णयामुळे कोकणातील जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार: मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगाने पूर्ण करता येईल, ज्यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. विमानसेवेमुळे व्यापारी आणि उद्योजकांना जलद कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल.निसर्गरम्य कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला नवी उंची मिळेल.
सिंधुदुर्गकरांच्या हितासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या खा.नारायण राणे यांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोकणच्या विकासाला आणखी बळ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!