22.2 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पगारापासून वंचित

शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप

निलंबनाची कारवाई करा, शिक्षक परिषदेची मागणी

सिंधुदुर्गनगरी : ऑगस्ट महिन्याचा अर्धा काळ उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे महत्त्वाचे सण होऊन गेले तरीही जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून त्यांचे कर्जाचे हप्तेही वेळेवर भरणे शक्य होणार नाही. या परिस्थितीला माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी या पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्यवाह नंदन घोगळे, आणि कोकण विभागाचे कार्याध्यक्ष सलीम तकीलदार यांनी केलेल्या मागणीनुसार, कविता शिंपी यांनी ३१ जुलै रोजी अचानक रजा टाकली. रजेवर जाण्यापूर्वी पगार बिलांवर सह्या न केल्याने ही समस्या निर्माण झाली. शिक्षकांना वेठीस धरण्याच्या उद्देशाने त्यांनी जाणीवपूर्वक असे केल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. त्यामुळे, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र घेबुडकर यांच्याकडे करण्यात येणार आहे. शिंपी यांची जिल्ह्यातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लाखो रुपये कमावल्याचा परिषदेचा दावा आहे. अनेक प्रकरणे अंगाशी येण्याची शक्यता असल्याने आणि १५ ऑगस्टला काही शिक्षक उपोषणाला बसणार असल्याच्या भीतीने त्यांनी वैद्यकीय रजेचे नाटक केले आहे, असा दावाही परिषदेने केला. या रजेची आणि त्यांच्या वादग्रस्त कार्यकाळाची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी परिषदेने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!