सावंतवाडी : तळवडे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रावणमास चक्रीय नॉनस्टॉप भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ कणकवली यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत जिल्ह्याभरातील भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. स्व. प्रकाश परब यांच्या स्मरणार्थ आमदार दीपक केसरकर यांच्या पुरस्कृत शिवसेना तळवडे आणि प्रकाश परब फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात उत्कृष्ट गायन आणि वादनाचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी यांनी तर तृतीय क्रमांक सिद्धिविनायक प्रसादिक भजन मंडळ कणकवली यांनी पटकावला. तसेच, चतुर्थ क्रमांक सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ कुडाळ यांना देण्यात आला, तर कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ वेत्ये यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत वैयक्तिक कलाकारांनाही त्यांच्या अप्रतिम कामगिरीबद्दल विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून प्रथमेश निगुडकर (कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये), उत्कृष्ट झांज वादक म्हणून अनिकेत पाटकर (कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये), उत्कृष्ट तबला वादक म्हणून श्री. प्रथमेश नाईक (लिंगेश्वर पावणाई, कणकवली), उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून तुषार लोट (सिद्धिविनायक, कणकवली), उत्कृष्ट गायक म्हणून प्रसाद आमडोसकर (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ) आणि उत्कृष्ट कोरस म्हणून वैभव सावंत (सद्गुरू संगीत प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ) यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रकाश परब फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज परब यांच्यासह महेश परब, रोहित परब, बाळू कांडरकर, रमाकांत परब, सोमनाथ रेडकर, मेहल कांडरकर, ओंकार नाईक, नितेश परब, रोहन परब, बबन काळे, सदाशिव परब, शत्तम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. प्रसाद आडेलकर यांनी केले, तर श्री. रुपेंद्र परब आणि श्री. रुपेश पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेमुळे तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.