संघटना आक्रमक; तात्काळ निधी उपलब्ध करून द्या, दीपक केसरकरांकडे मागणी
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांची तब्बल ५०० कोटी रुपयांची विकास कामाची दिले पेंडिंग आहेत. त्यामुळे ठेकेदार आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी सिंधुदुर्ग बांधकाम ठेकेदार संघटनेच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत केलेल्या कामांचा समावेश आहे. मार्च २०२५ नंतर कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आपली घरे, जमिनी गहाण ठेवून बँकेची कर्ज घेतली. मात्र बिले न झाल्यामुळे हप्ते थकले आहेत. बँकांनी नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आता करायचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आज संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी अशोक पवार, अवधूत नार्वेकर, दया परब, अर्जित पोकळे, आकांक्षा पवार, आदित्य पवार, आदर्श पवार, दिलीप नार्वेकर, रोहित नाडकर्णी, अंकित तेंडुलकर, निखिल कोंडीये, अभिषेक देऊलकर, दर्शन पाटील, रोशन डेगवेकर, गणेश म्हाडदळकर, चंद्रकांत बिले, संतोष शेडगे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात असे म्हटले आहे की, वेळेवर कामे पूर्ण करूनही निधी मिळत नसल्याने ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक ठेकेदारांनी आपली घरे आणि जमिनी गहाण ठेवून बँक कर्ज घेतले आहे, मात्र देयके न मिळाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले आहेत. यामुळे बँकांनी त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत आणि त्यांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहे, ज्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे अशक्य झाले आहे. या कर्जबाजारीपणामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सिमेंट, वाळू आणि खडी पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांचीही मोठी रक्कम थकल्याने त्यांच्याकडून पैशांसाठी तगादा लावला जात आहे, ज्यामुळे ठेकेदारांवर मोठा मानसिक ताण येत आहे. सांगली जिल्ह्यातील एका ठेकेदाराने निधी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, सिंधुदुर्गातील ठेकेदारांनीही अशीच भीती व्यक्त केली आहे. त्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी ही सर्व देयके अदा करण्याची विनंती केली आहे.