ठाकरे शिवसेनेचा आरोप; “आका” बनण्याचा प्रयत्न नको, पालकमंत्र्यांसह केसरकरांवर टीका…
सावंतवाडी : शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून साटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंग खाणीवर बेकायदा मायनिंग सुरू आहे. लीज एकीकडे आणि उत्खनन दुसरीकडे असा प्रकार आहे. त्यामुळे या मागचे नेमके “आका” कोण?, याचा आम्ही शोध घेणार, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. दरम्यान कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित खनिकर्म अधिकाऱ्याची चौकशी करून त्याची तात्काळ उचल बांगडी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच या प्रकारामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. या सर्वांच्या कृपाशीर्वादामुळे या ठिकाणी बेकायदा मायनिंग सुरू आहे. ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणी खोटी लीजची परवानगी वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. या प्रकारामागे मोठा घोटाळा असून हा प्रकार खनिकर्म अधिकारी आमदार, पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान या ठिकाणी सुरू असलेले बेकायदा उत्खनन तात्काळ रोखणे गरजेचे आहे. अन्यथा त्या ठिकाणी खाणीमध्ये पाणी भरून डोंगराखाली असलेल्या घरांना कधीही मोठा अपघात होऊ शकतो आणि कळणे गावाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे तात्काळ याबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे, असे राऊळ व धुरी म्हणाले. दरम्यान यावेळी त्या दोघांनी दीपक केसरकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी सुरू असलेल्या मायनिंग उत्खननाला आमदार म्हणून दीपक केसरकर यांचा वरदहस्त आहे का?, दोन्ही राणे यासाठी ताकद देत आहेत का? नितेश राणे या बेकायदा मायनिंगचा आका बनण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल करत पंधरा दिवसात यावर कारवाई करावी, अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, अशोक धुरी, लक्ष्मण अनोडकर, प्रशांत बुगडे, विजय जाधव आदी उपस्थित होते.