शासनाचा निर्णय : अवयव प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर
कणकवली : गरीब व गरजू रुग्णांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. हृदय, किडनी, यकृत यासारख्या महागड्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी आता लाखो रुपये खर्च करायची गरज राहिलेली नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला असून, गरजू रुग्णांना हे उपचार आता मोफत मिळू शकणार आहेत.
अवयव किडनी सध्याच्या घडीला अवयव प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. विविध रुग्णालयांत वेगवेगळे दर शस्त्रक्रिया तसेच प्रत्यारोपणासाठी आहेत. प्रत्यारोपणासाठी १० ते १२ लाख, यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणासाठी १८ ते २५ लाख, हृदय प्रत्यारोपणासाठी २० ते ३० लाख, तर कॉर्निया प्रत्यारोपणासाठी १.५ लाख रुपये असा सर्वसाधारणपणे खर्च येतो.
हा खर्च सामान्य नागरिकाला परवडणारा नसल्यामुळे अनेक रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने अधिकृत मान्यता प्राप्त रुग्णालयांना प्रत्यारोपणासाठी ५ लाख रुपयांचे पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. या पॅकेजमध्ये शस्त्रक्रिया, औषधे, रुग्णालयात राहण्याचा खर्च, आयसीयू सुविधा यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, काही वेळेस प्रत्यारोपणाचा खर्च पाच लाख रुपयांपेक्षा अधिक होतो. अशा परिस्थितीत सरकारकडून विशेष निधीच्या माध्यमातून उर्वरित रक्कमही भरून देण्यात येणार आहे. त्यामुळे उपचारात अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे गरिबांचे जीव वाचण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना दुसरे आयुष्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या कागदपत्रांची लागणार आवश्यकता…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामध्ये पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड, अन्न सुरक्षा कार्ड, आधार कार्ड, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा आर्दीचा समावेश आहे.
लाभासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून पारदर्शक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
ऑनलाइन प्रणालीमुळे उपचार प्रक्रियेत वेग येणार असून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
योजनेतील उपचार मर्यादा
१) सर्वसाधारण आजारांसाठी : १.५ लाखांपर्यंत
२) गंभीर शस्त्रक्रियांसाठी : ५ लाखांपर्यंत
३) विशेष परिस्थितीत : १० लाखांपर्यंत विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे
१३२६ आजारांवर मोफत उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सध्या १३२६ आजारांवर मोफत उपचार दिले जातात. सरकारने यामध्ये आणखी दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात अधिकाधिक गंभीर आजारांचे उपचारही मोफत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील शेकडो सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविली जात असून, याद्वारे गरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टीने मोठा आधार मिळाला आहे.