आचरा पोलिसांची यशस्वी कामगिरी
आचरा : आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयित गुलाम उर्फ गुल्लू मुन्नवर हुसेन. (रा सेंदवा मध्यप्रदेश) व यावरबेग हिम्मत अली बेग (रा कुर्ची बेळगाव) यांना ताब्यात घेण्यात आचरा पोलीसांना यश आले आहे. संबंधित संशयिताना शहादा पोलीस स्टेशन नंदूरबार येथे जबरी चोरी प्रकारणात अटक झाली होती. सदर संशयित हे आचरा चोरी प्रकारणातील असल्याचे समजल्यानंतर आचरा येथून पथक रवाना होत. त्याना आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली.
सोळा आक्टोबर रोजी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात दोन अज्ञात व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने येवून हातचलाखी करत सुमारे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते. काहीवेळाने कारेकर यांच्या चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर संशयितांची शोधाशोध करून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. दरम्यान, संशयित चोरटे हे दुचाकीवरून आले होते. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सीसीटिव्हीत कैद झाली होती. तसेच एका दुकानाच्या सीसीटीव्हीत दोन्ही चोरट्यांची छबी कैद झाली होती. याबाबत तपास आचरा पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु होता. चोरी प्रकरणात वापरलेल्या दुचाकी मालक याकूब जानशहा इराणी वय 57 याला स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्ग पुणे येथून ताब्यात घेऊन आचरा पोलीसांच्या ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यानंतर आचरा पोलिसांना संशयितांपर्यंत पोहचण्यात यश आले आहे. दोन्ही संशयितांना आचरा ठाण्यात आणले असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली.