बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा, रोणापाल आणि निगुडे गावांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः नवजात वासरांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या या गावांमध्ये लम्पीचा संसर्ग वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.मडुरा परिसरात मोठ्या संख्येने दुधाळ जनावरे आहेत. राज्य शासनाच्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेतून जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी गाई आणि म्हशी घेतल्या आहेत. दुग्धोत्पादन हा येथील अनेक शेतकऱ्यांचा प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे. मडुरा, रोणापाल आणि निगुडे या गावांतून मोठ्या प्रमाणात दूध संकलन होते. लम्पी रोगामुळे दुग्धव्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्याच्या विविध भागांत लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढताना दिसत आहे. मडुरा, रोणापाल आणि निगुडे गावांमध्ये आत्तापर्यंत १८ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. यापैकी १५ जनावरे रोगातून बरी झाली असून, तीन वासरांवर सध्या उपचार सुरू आहेत. अशी माहिती मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. फणसेकर यांनी दिली.