मनसेच्या विद्यार्थी सेनेचा इशारा; सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर
सावंतवाडी : तालुक्यातील विविध शाळांच्या परिसरात १०० मीटरच्या आत मटक्याचे स्टॉल थाटले आहेत. उघडपणे दारू विक्री होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संबधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतच्या पालकांच्या तक्रारी असून मुलांच्या बॅगमध्ये मटक्याच्या चिठ्ठया, दारूच्या बाटल्या सापडत आहेत. त्यामुळे तात्काळ कारवाई करा, अन्यथा मनसेची विद्यार्थी सेना आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक शाळांच्या परिसरात १०० मीटरच्या आत मध्ये विविध मटक्याची स्टॉल बीन बोभाटपणे सुरू आहेत. दारू विक्री होत आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करून हे अवैद्य प्रकार बंद करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.