मालवण : वारस तपासासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मसुरे येथील तलाठी निलेश दुधाळ याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मसुरे गावातील दोन ग्रामस्थांनी वारस तपासासाठी आवश्यक अर्ज तक्रारदारामार्फत तलाठी कार्यालयात सादर केले होते. हे अर्ज प्रलंबित ठेवल्याने संबंधित तक्रारदाराने याबाबत तलाठ्याला विचारणा केली असता त्याने दोन्ही अर्जांचे ४ हजार रुपये देण्यास कळवले. मात्र तक्रारदाराने ही रक्कम न देता याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार काल या पथकाने सापळा रचत चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी निलेश दुधाळ याला पकडले. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे