कलमठ बिडयेवाडीत बंद फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न फसला
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; यंत्रणा अलर्ट मोडवर
कणकवली : शहरातील कलमठ – बिडयेवाडी येथील भोसले रेसिडेन्सीमधील फ्लॅटच्या सी विंगमधील बंद असलेला फ्लॅट अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
गुरुवार रात्री कलमठ -बिडयेवाडी येथील भोसले रेसिडेन्सीमधील ब्लॉक सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावर राजेंद्र परब यांचा बंद असलेला फ्लॅटचा दरवाज्याचा कडीकोयंडा तोडला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी लगतच्या फ्लॅटधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फ्लॅटची पाहणी केली असता लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे दिसून आले.
दरम्यान, या फ्लॅटचे मालक मुंबई असल्याने या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
कणकवली शहरात घडत असलेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.