ओरोस – कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ओरोस येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रथमेश सावंत यांनी सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावे, पालकांना मदतीचा हात मिळावा आणि त्यांना ज्ञानार्जन करून आपले करिअर घडवता यावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करते. यावर्षीही सिंधुदुर्ग, पुणे, बीड, अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप झाले असून, त्याचाच एक भाग म्हणून ओरोस येथे ५० दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. कोकण संस्था करत असलेले सामाजिक उपक्रम जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत, असे सिंधुदुर्ग अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला कोकण संस्थेचे प्रथमेश सावंत, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, कोकण संस्थेच्या गौरी आडेलकर, वैष्णवी म्हाडगूत आणि अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले तर अनिल शिंगाडे यांनी आभार प्रदर्शन केले.