कणकवलीच्या सामाजिक चळवळीतील सक्रिय चेहरा हरपला
दुपारी १२:३० वा. च्या सुमारास कणकवलीत होणार अंत्यसंस्कार
कणकवली : शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी व सेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर (वय ६८) यांचे गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दादा कुडतरकर हे नाव कणकवलीसह जिल्ह्यात परिचित होते. जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची मोठी संघटना उभी करत त्यामध्ये आपल्याला झोकुन दिले होते.
कणकवली शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात दादा कुडतरकर यांचा सक्रिय सहभाग असे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये आपल्याला झोकुन दिले होते. सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कणकवली रोटरी क्लब यासह अनेक संघटनाचे ते पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते होते. पदरमोड करून सामाजिक कामाला त्यांची आर्थिक मदतही करण्याचा हात पुढे असे. कणकवलीच्या सामाजिक चळवळीतील एक सक्रिय चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त करत दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विमा प्रतिनिधी प्रशांत व विवाहित मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी १२:३० वा. च्या सुमारास कणकवलीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.