मालवण : तालुक्यातील कोळंब येथील रहिवासी आणि ‘ग्लोबल रक्तविरांगणा’ महिला पदाधिकारी सौ. नेहा गणेश कोळंबकर (वय ३५) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची आकस्मित मृत्यू (Accidental Death) म्हणून नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा कोळंबकर यांनी जनरेटरसाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. शेजाऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ नातेवाईकांना कळवले. नेहा यांचे पती गणेश कोळंबकर घटनास्थळी पोहोचले, परंतु त्यांना वाचवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नेहा कोळंबकर या ‘हॉटेल मालवणी’चे मालक गणेश कोळंबकर यांच्या पत्नी होत्या. त्या सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक राजा शंकरदास यांच्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू, आई, वडील, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नेहा कोळंबकर या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरहिरीने सहभागी होत असत. ‘ग्लोबल रक्तदाते’ संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, महिला रनिंग आणि इतरही उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असे. बचतगट चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले होते. बचतगट, प्रभागसंघ, रक्तदान चळवळ आणि निसर्गप्रेमी अशा विविध संस्थांशी त्या जोडल्या गेल्या होत्या.
नेहा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोळंब आणि मालवण शहरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी दिवसभर त्या नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कार्यरत होत्या. मुलाचा अभ्यास घेण्यासाठी त्या घरात गेल्या होत्या आणि संध्याकाळी मुलाला झोपवून पुन्हा हॉटेलमध्ये परतल्या होत्या, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
नेहा यांच्या आकस्मित निधनाबद्दल मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. तसेच कोळंब गावातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. दुपारी नेहा यांचा मृतदेह कोळंब येथील घरी आणल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. कोळंब स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप खाडे हे करत आहेत.