डॉ. शरयू आसोलकर; वेंगुर्ले नगर वाचनालयाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
वेंगुर्ला : मोबाईल ही सध्याची गरज असली तरी, त्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठी करून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम बनावे, असा सल्ला कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू आसोलकर यांनी दिला. नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे विविध देणगीदारांच्या सहकार्यातून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ तसेच स्व. सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार वितरण असा एकत्रित कार्यक्रम संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. शरयू आसोलकर यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर आणि सदस्य महेश बोवलेकर उपस्थित होते. डॉ. आसोलकर पुढे म्हणाल्या की, भाषा ही आपली अर्जित संपत्ती आहे. ती स्वतः कमवावी आणि टिकवावी. भाषेची श्रीमंती विद्यार्थ्यांना कळावी आणि पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांमधून मंगेश पाडगांवकर, वि.दा. करंदीकर यांसारखे साहित्यिक निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेतर्फे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम आलेल्या, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यावेळी वेंगुर्ले येथील रहिवासी व दोडामार्गचे कृषी अधिकारी प्रसाद विश्वनाथ खडपकर यांना सुदत्त कल्याण निधी संस्थेने दिलेल्या देणगीतून जाहीर झालेला स्व. सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार डॉ. शरयू आसोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
यावेळी संस्थेचे उपकार्यवाह माया परब, सदस्य दीपराज बिजितकर तसेच सुनील मराठे, नितीन कुलकर्णी, श्रीनिवास सौदागर, तुषार कामत, ज्ञानेश्वर हरमलकर, चंद्रकांत सावंत, जॉन्सन डिसोजा, यशोगंधा मोर्जे, नरेंद्र वराडकर, विनय सामंत, विशाखा वेंगुर्लेकर, सोनाली खडपकर, प्रीतम ओगले यांच्यासह पालक, विद्यार्थी, वाचक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते..आभार कैवल्य पवार यांनी मानले.