कणकवली : विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत किर्लोस कृषी विज्ञान केंद्रातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० गावांमध्ये कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना मार्गदर्शन केले. या अभियानात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ केशव देसाई, विवेक सावंतभोसले, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र पालव, सिद्धेश गावकर, झीलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबईचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. मनोज ब्राह्मणे, डॉ. किरण रसाळ यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शनापर कार्यक्रमाचा लाभ घेतला.
उत्तर सिंधुदुर्ग आणि दक्षिण सिंधुदुर्गसाठी दोन टीमद्वारे कृषी विभाग आत्मा, ग्रामपंचायत व शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत हे अभियान राबविण्यात आले. यात शास्त्रज्ञ व अधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. अभियानामध्ये प्राधान्यक्रमाने नैसर्गिक शेती, हवामान बदलावर आधारित कृषी तंत्रज्ञान, पिकांचे सुधारित वाण, फळ प्रक्रिया, कुक्कुटपालन, बीज प्रक्रिया पिकांच्या लागवड पद्धती, एकात्मिक रोग व दूध व्यवस्थापन, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, कृषी विषयक विविध योजना इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढवण्यात जात आहे. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.