सावंतवाडी : येथील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद सुभाष पडते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. दोन दिवस त्यांचे घर बंद होते. आज घराच्या दरवाज्यात मोठ्या प्रमाणात रक्त दिसले. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ येऊन नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत बाळकृष्ण कोल्ड्रिंकच्या बाजूला प्रसाद कोल्ड्रिंक नावाचे दुकान आहे. गेली अनेक दिवस ते त्या ठिकाणी कोल्ड्रिंकचा व्यवसाय करतात. गेले चार दिवस ते कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते. आज त्यांचा दरवाजा बंद होता. दरम्यान तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संशय आला असता त्यांनी यावेळी कल्पना पोलिसांना दिली. त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. कटावणीच्या साहाय्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. आत जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह गळफास लावलेला अवस्थेत दिसला. दोन ते तीन दिवस झाले असल्यामुळे त्यांच्या मृतदेहातून रक्त दरवाज्या बाहेर आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात नेण्यात आला. पडते हे सालईवाडा येथील घरात एकटेच राहत होते. त्यांच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते व्यावसायिक असले तरी अन्य लोकांशी किंवा शेजाऱ्यांशी तितकेसे मिसळत नव्हते. त्यामुळे त्यांचा जास्त संपर्क नव्हता. आज दुपारी त्यांच्या घरातून रक्त आल्याचे दिसल्यानंतर त्यांचे काका आबा पडते व तेथील सामाजिक कार्यकर्ते राजू भाट यांनी पोलिसांच्या उपस्थितीत कटावणीच्या साहाय्याने दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक, सचिन चव्हाण आदींनी धाव घेतली आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने “तो” मृतदेह रुग्णालयात हलविला.