रुग्णांचे होणार हाल ; तात्काळ यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी
सावंतवाडी : शासनाकडून बिलापोटी देण्यात येणाऱ्या ३७ कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कंपनीकडून सुरू असलेली सिटीस्कॅन यंत्रणा आजपासून बंद करण्यात आली आहे. याबाबत अचानक माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सिटीस्कॅनसाठी आलेल्या रुग्णांना हात हलवत माघारी फिरावे लागले. त्यामुळे लवकरात-लवकर ही यंत्रणा चालू होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे, अशी मागणी रुग्णांतून होत आहे. नुकतेच या मशीनला एक वर्ष पूर्ण झाले होते. वर्षभरात तब्बल ९ हजार हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला होता. याबाबतचे वृत्त नुकतेच प्रकाशित करण्यात आले होते. परंतु त्या वृत्ताला काही काळ उलटतात बील थकीत असल्याने आजपासून ही यंत्रणा बंद करण्यात आल्याचे कंपनीचा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अचानक याबाबतचा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना अन्य खाजगी सिटीस्कॅन केंद्राकडे धाव घ्यावी लागली. परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध होण्यासाठी हे मशीन तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.