22.4 C
New York
Sunday, June 8, 2025

Buy now

कृषी-दूतांकडून वाफोलित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

बांदा : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथून आलेल्या सात कृषी-दूत विद्यार्थ्यांनी वाफोली गावात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांना शेतीत अधिक उत्पादन व नफा मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना नवीन वाणांची माहिती, योग्य खतांचा वापर, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, कीड व रोग नियंत्रण तसेच हवामानाशी सुसंगत शेतीच्या पद्धती यासंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन मिळत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “हरित वाफोली”चा संकल्प ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त याच विद्यार्थ्यांनी वाफोली गावात विशेष जनजागृती कार्यक्रम राबवला. हरित वाफोलीचा निर्धार करत आयोजित या कार्यक्रमात वृक्षारोपण, पर्यावरणाचे महत्त्व, प्लास्टिकमुक्त गाव, वनीकरण आणि जलसंवर्धन यावर विशेष भर देण्यात आला. ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी गावचे सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी उपसभापती विनायक दळवी, माऊली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, तसेच राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या कार्यामुळे वाफोली गावात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, कृषी-दूत विद्यार्थ्यांनी गावाच्या शेती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या गटात प्रज्वल उगवेकर, आर्य मोरजकर, वैष्णव जगदाळे, अथर्व देवळेकर, राज नाईक, यश वाघ, संतोष घेरडे यांचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!