राजकारणातील निस्वार्थी व्यक्तिमत्व
राजकीय वादात न अडकता सर्वसामान्य शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं नेतृत्व
सिंधुदुर्ग ( मयुर ठाकूर ) : प्रमोद जठार म्हणजे हसर्या चेहेऱ्याचे उमदे नेतृत्व. त्यांच्यासोबत चर्चा करताना लक्षात येते ती प्रगल्भता. अनेक विषयांचे आणि पुस्तकांचे केलेले वाचन आणि समाजाप्रती असलेली आत्मीयता त्यांना समाज सेवेत नेहमीच कार्यरत राहण्यास प्रवृत्त करत असते. कोकणात बंद असलेल्या घरांचे दरवाजे उघडले पाहिजेत. रोजगाराच्या वाटा कोकणातच निर्माण झाल्या पाहिजे. आपल्या लाल मातीतील तरुण-तरुणी यांनी कोकणातच राहून काम केलं पाहिजे. यासाठी विकासाचे स्वप्न घेऊन धडपडणारे प्रमोद जठार हे एक भारतीय जनता पार्टीतील एक कणखर नेतृत्व आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची केलेली पक्ष बांधणी ही लक्षवेधी आहे. राजकीय वादात न अडकता सर्वसामान्य शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. तसेच भारतीय जनता पार्टीत काम करत असताना सत्ता असो वा नसो किंवा पद असो किंवा नसो पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची सचोटी प्रमोद जठार यांची आहे. या भूमिकेतून अविरत मेहनत घेणारे भाजपाचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांचा १९ एप्रिल २०२४ रोजी ५९ वा. वाढदिवस…..त्यानिमित्त घेतलेला हा थोडक्यात आढावा.
अलीकडच्या काळात राजकारण व समाजकारणातही समाजमूल्ये हरवत चालल्याची उदाहरणे सर्वांसमोर आहेत. पदाबरोबरच आपली पत, प्रतिष्ठा सांभाळून वागणारे लोक फार कमी सापडतात. स्वतःचे अवडंबर आणि स्तोम माजविणारे अनेकजण नजरेस पडतात. समाजाशी आपले काय देणे लागते? याचाही विसर अनेकांना पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. मात्र, माजी आमदार प्रमोद जठार हे राजकारण आणि समाजकारणात समोरच्याला दिलेला शब्द पाळणारे आणि विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात १६ वर्षांपूर्वी नवख्या असलेल्या प्रमोद जठार या एका मुंबईस्थित उद्योजकाने प्रवेश केला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला अगदी मरगळ आलेली होती. या स्थितीत ते जिल्ह्यात आले.
अवघ्या काही वर्षांतच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. नेता कसा असावा, नेत्याने कार्यकर्त्यांना काय आश्वासने द्यावीत, कशी स्वप्ने दाखवावीत, पक्ष संघटना कशी बळकट करावी? हे प्रमोद जठार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने येथील जनतेला दाखविली. सुरुवातीला त्यांच्या या स्वप्नांवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
मात्र, आज त्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत. प्रमोद जठार म्हटले की, प्रामुख्याने पहिले चित्र डोळ्यासमोर येते ते म्हणजे प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्प. सुरुवातीला प्रमोद जठार यांना अगदी टोकाच्या आरोपांनी या रिफायनरीच्या संदर्भात हिणवले गेले. अनेक आरोप झाले. पण राजकारणातले कसलेले खेळाडू असलेल्या प्रमोद जठार यांनी त्याला खुबीने उत्तर दिले. येथील तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टीने तो प्रकल्प कसा उपयुक्त आहे, हे ते आजही ठामपणे सांगतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात धवलक्रांतीचे स्वप्न दाखवणारी सिंधूभूमी डेअरी कोकण दूधच्या माध्यमातून अवघ्या जिल्ह्यात समोर आली. नुसती स्वप्ने दाखवून प्रमोद जठार थांबले नाहीत तर त्यांनी स्वप्नांसाठी स्वतःचे अस्तित्वदेखील पणाला लावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी दुग्ध विकासाचे अनेक प्रयत्न झाले. मात्र ते म्हणावे तसे यशस्वी ठरले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रमोद जठार यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधूभूमी डेअरीच्या माध्यमातून सुरू झालेला कोकण दूध हा ब्रँड जिल्ह्यात घराघरात पोहोचला आहे. प्रमोद जठार यांनी धवलक्रांतीच्या गप्पा केल्या नाहीत तर त्यादृष्टीने यशस्वी प्रयत्नदेखील केले. यातून अनेक रोजगारही त्यांनी स्थानिकांच्या हाताला दिले. शासकीय ऊस संशोधन केंद्र नापणे-वैभववाडी येथे प्रस्तावित केले असतानाच वैभववाडी, खारेपाटणा बसस्थानकांच्या जमिनीच्या प्रश्नासाठीदेखील प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आडाळी येथे भारत सरकारच्या आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्राच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी आल्या.मात्र, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रमोद जठार यांनी अखेर सिंधुदुर्गवासीयांना दाखवलेले हे स्वप्नही सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सिंधूभूमी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्ण सेवेकरिता त्यांनी प्रयत्न केले. कोविड काळात विरोधी पक्षात असूनही डॉक्टर हा देखील माणूसच आहे या भावनेतून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना स्वतः धीर देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पीपीई किट घालून जाणारे जिल्ह्यातले पहिले राजकीय नेते हे प्रमोद जठारच होते. गेली अनेक वर्षे स्वप्नात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कोकणात गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून प्रमोद जठार यांनी सातत्याने प्रयत्न केले. यामध्ये कणकवली किंवा संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचा प्रश्न असो अथवा राजापूर, परशुराम घाट, कुडाळ या ठिकाणच्या महामार्गाच्या समस्यांबाबत नितीन गडकरी यांच्याजवळ या समस्या थेट पोहोचविण्याचे व त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्नदेखील प्रमोद जठार यांनी केला.
अखेर गेली अनेक वर्षे कोकणात कोकणवासीयांनी पाहिलेले महामार्ग चौपदरीकरणाचे स्वप्नदेखील आता पूर्ण होत आहे. वैभववाडी येथील कोकिसरे रेल्वे उड्डाण पुलाच्या संदर्भातही सातत्याने नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावण्यासाठी पुढाकार घेणारेदेखील प्रमोद जठार हेच होते. राजकारणात श्रेयवाद हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो.
मात्र अशा श्रेयवादाच्या भानगडीतच न पडता प्रमोद जठार यांनी आपले कार्य सुरू ठेवले. त्या कार्याला यश आल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठीसुद्धा त्यांनी यत्किंचितही धडपड केली नाही. कारण जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की या सर्व प्रकल्पांची मागणी करणारे प्रमोद जठार हेच आहेत, असे ते सांगतात. ज्यावेळी प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रवेश केला त्यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात त्यांना काम करावे लागत होते. पण, नारायण राणेंसारख्या बलाढ्य नेत्यासमोर काम करताना विरोधक असून देखील आपल्या खास शैलीने त्यांचे मन जठार यांनी जिंकले. राणे यांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भात जेव्हा चर्चा सुरू झाली. त्यावेळी जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा व्हायला हवी, तर राणे यांच्यासारखे बलाढ्य नेते भाजपमध्ये यायला हवेत, अशी भूमिका जठार यांनी घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला कार्यकर्ता नेता म्हणून केव्हा वावरलाच नाही.
प्रमोद जठार यांची खास भाषण शैली ही अनेकांना भावते. ज्या ठिकाणी ते जातील तेथे जनतेच्या प्रश्नांना हात घालून जनतेच्या मनातील शब्दांना वाचा फोडण्याचे काम प्रमोद जठार यांच्याकडून होते. जनतेचे प्रश्न मांडत असताना विरोधकांच्या आरोपांची चिरफाड करणे व अस्खलित शब्दफेकीने विरोधकांच्या तोंडचे पाणी पळविणे प्रमोद जठार यांची अजून एक खासियत आहे. केंद्रातील बहुतांश मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा टप्पा पार करण्यात भूमिका बजावणारे प्रमोद जठार यांचे काम हे ‘हार न मानूंगा’ याप्रमाणे सुरूच असते. केंद्राच्या अखत्यारीत येणारे प्रकल्प साकारण्याकरिता प्रमोद जठार यांनी घेतलेले कष्ट हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. विरोधक असला तरी त्याला आपल्या खास स्टाइलने जिंकण्याची कला व कसब है जठार यांच्याशिवाय कुणाकडे असलेले सहसा पाहायला मिळत नाही. ‘मंदिर उभविणे हेच अमुचे शील। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ असे ते विनयाने सांगतात. माजी आमदार प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !