पालकमंत्री नितेश राणेंचा इशारा
कचरा संकलनासाठी नव्या गाड्या, नाट्यगृह, मच्छी मार्केटसाठी जागेची मागणी
देवगड : पर्यटन दृष्ट्या देवगड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. परंतु विकास कामे प्रलंबित ठेवण्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाकणार, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिला. दरम्यान नाट्यगृह आणि मच्छी मार्केट साठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच शहरात कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. राणे यांनी आज शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ते पुढे म्हणाले, देवगड शहराने पर्यटन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याने या पुढील काळात वाहतूक कोंडी मुक्त शहर म्हणून या शहराची ओळख निर्माण होण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. शहरांमध्ये मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. हा निधी वेळेत खर्च करून विकासकामे पूर्ण, करा असेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू , मुख्याधिकारी सूरज कांबळे, नगरसेवक शरद ठुकरुल, निवृत्ती तारी, संतोष तारी, प्रणाली माने, मनीषा जामसंडेकर, विश्वनाथ खडपकर, रुचाली पाटकर, आद्या गुमास्ते, नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर आदी उपस्थित होते.