सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा व विधानसभा मतदारसंघात स्त्रीशक्तीची ताकद दिसेल. या ठिकाणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन भागात तर विधानसभा मतदारसंघ चार भागात विभागला जाईल. त्यामुळे एका लोकसभेत तर दोन विधानसभेत महिला लोकप्रतिनिधी दिसतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी आज येथे आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केला. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नेहमी लोकहितासाठी आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी काम केले. त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढीने जपावा, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या माध्यमातून आज सावंतवाडीत अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येथील राजवाड्यातील सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, माजी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, डॉ. ज्योती तोरस्कर, आंबोली मंडल अध्यक्ष प्राजक्ता केळुस्कर, समन्वयक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रदेश सदस्या तथा माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी गावकर, मेघा गांगण, माजी सभापती मानसी धुरी, मिसबा शेख, सुजाता देसाई यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने अहिल्यादेवींचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती घेतलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आपला पक्ष ज्यावेळी एखादा कार्यक्रम देतो त्यावेळी त्यामागे निश्चितच कोणतीतरी महत्त्वाची भूमिका असते. अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास व त्यांचा संघर्षमय जीवनातील लोकाभिमुख प्रवास आपल्याला ज्ञात व्हावा व त्यातून भविष्यातील आदर्शवत लोकप्रतिनिधी निर्माण व्हावे हाच यामागील उद्देश आहे. इतर कोणत्याही पक्षाने अशा प्रकारे कार्यक्रम राबवले नाहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आगामी निवडणुकीत स्त्रीशक्ती दिसेल २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कदाचित दोन भागांमध्ये विभागला जाईल. तसेच, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन तीन ऐवजी चार विधानसभा मतदारसंघ निर्माण होतील. त्यावेळी महिलांची संख्या लक्षात घेता रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गपैकी एका मतदारसंघात महिला खासदार निवडून येईल, तर चार विधानसभांपैकी दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आमदार असतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. महिला आरक्षणामुळे अनेक महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर सरपंच, सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे आपला कारभार केला तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला कारभार लोकाभिमुख व जनतेच्या हिताचा करून आपल्या खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. तसे केल्यास आपला भारत देश महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सद्यस्थितीत काही ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी आपल्या पतींवर अवलंबून असल्याचे दिसून येते, परंतु याबाबत आपण सर्व महिला लोकप्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या आहेत. उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार करण्यासाठी अहिल्यादेवींचा आदर्श मनात बिंबवा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शासकीय कार्यालयात अहिल्यादेवींची प्रतिमा भिंतीवर लावलेली असते. अहिल्यादेवींच्या कारभाराची आठवणच या प्रतिमेच्या माध्यमातून व्हावी, हा त्यामागे उद्देश आहे. ‘मला माझ्या लोकांचे हित पाहायचे आहे’ हा विचार करून त्यांनी कारभार केला. त्यांनी ज्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले, त्याचप्रमाणे आपणही कारभार करावा याची आठवण त्यांच्या प्रतिमेतून व्हावी, असे ते म्हणाले. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तुमच्या नजरेसमोर अहिल्यादेवींचा कारभार असावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ जेव्हा एखादा कार्यक्रम देतात, तेव्हा त्यामागे फार मोठा हेतू असतो आणि तो स्तुत्य हेतू मनात ठेवूनच हा कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी केला, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. अहिल्यानगर हे नामकरण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली. त्यांच्या नेतृत्वातच सरकारने हे नामकरण पूर्णत्वास आणले. अलीकडेच अहिल्यानगर येथे ‘देवा भाऊ’ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली, हे फक्त महायुती सरकार आणि भाजप पक्षातच घडू शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमांमुळे भविष्यात महिला भगिनींवर जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी येईल, तेव्हा त्यांना या कार्यक्रमाची निश्चितच आठवण येईल. यासाठी अहिल्यादेवींचा इतिहास आवर्जून वाचा, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचा कारभार आणि जनहिताची कामे यांचा अभ्यास करा, असे आवाहनही त्यांनी केले.