कणकवली : शहरातील बस स्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली पार्किंग करून ठेवलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी ( एमएच ०७ एन ५८१५ ) बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ३:५६ वा. च्या सुमारास घडली. याबाबत गाडी मालक अशोक गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र कणकवली शहरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे भीतीचे वातावरण शहरात पसरले आहे.
याबाबत गाडी मालक अशोक गुरव ( वय ५२, रा. पिसेकामते, गावठणवाडी, बिडवाडी ) यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, अशोक गुरव हे वैभववाडी तहसिलदार कार्यालय येथे शिपाई म्हणुन नोकरीला आहेत. ( एम एच ०७ एन ५८१५ ) क्रमांकाची दुचाकी सहयाद्री हॉटेलच्या समोर मुंबई – गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली पार्किंग केली होती. (दि. २८ ) रोजी सकाळी नेहेमीप्रमाणे ८:३० वाजता कणकवली येथे उड्डाणपुलाखाली पार्कीग करून एस. टी. बसने वैभववाडी येथे कामाला गेले. सायंकाळी ६:१५ वा.च्या सुमारास दुचाकी पार्कींग केलेल्या ठिकाणी आल्यावर पाहिले असता त्यांना आपली पार्किंग केलेली दुचाकी आढळली नाही. यादरम्यान त्यांनी आजुबाजुला मोटारसायकलचा शोध घेतला. मात्र दुचाकी सापडली नाही. मात्र दुचाकीला असलेले हेल्मेट एका गादीवर सापडले. यावेळी अशोक गुरव यांनी आपला पुतीण्या अनिकेत गुरव याला फोन करून माहिती दिली व घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान यावेळी सहयाद्री हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा ३:५६ वा. च्या सुमारास एक अनोळखी इसम मोटारसायकलजवळ काहीतरी करत असल्याचे दिसत होते. त्यानंतर त्याने मोटारसायकलला लावुन ठेवलेले हेल्मेट काढुन ठेवुन तो मोटारसायकल चालु करुन तेथुन घेवुन जात असल्याचे अस्पष्ट दिसत होते. काळ्या रंगावर निळ्या – पांढऱ्या पट्टया असलेली हिरो होंडा कंपनीची स्ल्पेंडर प्लस मोटारसायकल आहे. एमएच ०७ एन ५८१५ क्रमांक आहे. अशा वर्णनाची गाडी जर कोणाला सापडली तर पोलीस ठाणे कणकवली याठिकाणी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.